व्रत उद्यापन
एखाद्या व्यक्तीने एखादा विधी एका ठराविक काळापर्यंत केला असता त्याला 'व्रत' असे म्हटले जाते. ते करत असताना काही यम / नियम अथवा बंधने पाळणे आवश्यक असते. असे केल्याने ईश्वरी कृपा होण्याचा संभव असतो.
व्रताचार किंवा व्रतवैकल्ये हा हिंदू संस्कृतीचा गाभा आहे. या व्रतांचे नित्य, नैमित्तिक व काम्य असे तीन प्रकार असतात. वर्षभरामधे ठराविक क़ाळात येणारी (ऐच्छिक असलेली) अनेक व्रते असतात. विशिष्ट वैयक्तिक कामना साध्य होण्यासाठी ही व्रते केली जातात.
एखाद्या विशिष्ट दिवशी (तिथीला) अर्धवेळ / पूर्णवेळ उपवास करुन, एखाद्या ठिकाणाला विवक्षित दिवशी भेट देऊन, विशिष्ट दिवशी नैमित्तिक पूजा करुन, ठराविक दिवशी एखाद्या सिद्ध मंत्राचा ठराविक संख्येत जप करुन अथवा अन्य कोणत्याही प्रयत्नाने व्रत केले जाते.
लवकर लग्न व्हावे, आरोग्य / धन प्राप्त व्हावे, नोकरी / धंद्यातल्या अडचणी दूर व्हाव्यात, जीवनातल्या कठीण काळात ईश्वराची कृपा होऊन तो काळ सुसह्य व्हावा इत्यादी किंवा यापेक्षाही काही निराळ्या वैयक्तिक कामनांसाठी व्रत केले जाते.
ठरवलेले व्रत विशिष्ट वेळी संपल्यानंतर त्याचे उद्यापन केले जाते. व्रत कोणते केले त्यानुसार उद्यापन विधी असतो.
सर्वसाधारणपणे खालील व्रते केली जातात...
हरितालिका व्रत, संकष्टीचतुर्थी व्रत, ऋषिपंचमी व्रत, उपांगललिता व्रत, प्रदोष व्रत, अनंत चतुर्दशी व्रत, शिवरात्र व्रत, वटसावित्री व्रत, १६ सोमवार व्रत, शिवमुष्टी व्रत, मंगळागौर व्रत, कोकिळा व्रत, इ.