Performance of Shraddha Ritual, Performing Shraddha Vidhi,

श्राद्ध

"श्रद्धया क्रियते यत्  तत् श्राद्धम् II" ही श्राद्धाची सर्वात सुटसुटीत व्याख्या आहे.  श्रद्धेने जे जे केले जाते त्यास श्राद्ध असे म्हणावे.  स्नेहाचे प्रतीक म्हणून तीळ, कर्तव्याचे प्रतीक म्हणून तांदूळ व भक्तीचे प्रतीक म्हणून पाणी या तीनही वस्तूंचा श्राद्धसमयी एकत्रित संयोग  होतो.

कर्तव्यपूर्तीची सुसंधी आपल्याला या श्राद्धाच्या निमित्ताने मिळते. आपल्या प्रिय निकटवर्तीयांचा मृत्योत्तर प्रवास हा सुखमय व क्लेशरहित व्हावा व त्यांना त्वरित सद्गती मिळावी यासाठी श्राद्धविधी आवश्यक ठरतो.

हिंदु धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतानुसार प्रत्येकाने `देवऋण, ऋषीऋण, पितृऋण व समाजऋण ही चार ऋणे फेडणे आवश्यक असते.  यापैकी पितृऋण फेडण्यासाठी श्राद्ध उपयुक्त ठरते.  श्राद्धविधी हा हिंदुधर्माचा अविभाज्य भाग आहे व धर्मशास्त्रात ते गृहस्थाश्रमी लोकांना कर्तव्य म्हणून सांगितले आहे.  शास्त्रनियमाप्रमाणे प्रत्येकाने हयात असेपर्यंत पितरांप्रती कृतज्ञता म्हणून प्रतिवर्षी श्राद्ध केले पाहिजे.

श्राद्धाचे मुख्यत: प्रेतश्राद्धे व पितृश्राद्धे असे दोन प्रकार आहेत.

प्रेतश्राद्ध : मृत्युनंतर सपिंडीकरण होईपर्यंत प्रेतास उद्देशून केलेल्या श्राद्धास प्रेतश्राद्ध असे म्हणतात. उदा : अवयवश्राद्ध, नवश्राद्ध, नग्नप्रच्छादनश्राद्ध, पाथेयश्राद्ध, अस्थिसंचयन श्राद्ध, वेदिकाश्राद्ध, महैकोद्दिष्टश्राद्ध, रुद्रगणश्राद्ध, वसुगणश्राद्ध, मासिकश्राद्ध, अब्दपूरितश्राद्ध, सपिंडीकरणश्राद्ध, नारायणबली, नागबली, त्रिपिंडीश्राद्ध , इ.

पितृश्राद्ध : सपिंडीकरणानंतर  गतव्यक्तीस पितृलोकाची प्राप्ती होते असे समजतात.  त्यामुळे वर्षश्राद्धानंतर केल्या जाणाऱ्या सर्व श्राद्धांना पितृश्राद्ध असे संबोधतात.  केवळ एकास उद्देशून "एकोद्दिष्टश्राद्ध" व त्रयींना उद्देशून "पार्वणश्राद्ध" असे याचे दोन पोटप्रकार आहेत.  उदा : तीर्थश्राद्ध, मातामहश्राद्ध, अक्षय्यतृतीयाश्राद्ध, घृतश्राद्ध, दधिश्राद्ध, पर्वश्राद्ध, भरणीश्राद्ध, उदकुंभश्राद्ध, सांवत्सरिकश्राद्ध, हिरण्यश्राद्ध, हस्तश्राद्ध, आमश्राद्ध, चटश्राद्ध, दर्शश्राद्ध, महालयश्राद्ध, अविधवाश्राद्ध, नांदीश्राद्ध, इ.

आपल्या कुळातील पितृलोक प्राप्त झालेल्या पितरांना पुढच्या लोकांत जाण्यासाठी साहाय्य करणे, ज्या मृत व्यक्तींना त्यांच्या अतृप्त वासनांमुळे सद्गती प्राप्त झाली नसेल त्यांना पुढची गती प्राप्त करून देणे, जे पितर भूलोकी केलेल्या कुकर्मामुळे पितृलोकात जात नाहीत त्यांना भूतयोनीतून मुक्त करणे असे विविध हेतू श्राद्धविधी करण्यामागे आहेत.

श्राद्धाविषयी काही ढोबळ नियम पुढीलप्रमाणे आहेत :

  • श्राद्धकर्मासाठी श्राद्धाची तिथी अपराह्णकाळी म्हणजे सामान्यपणे दुपारी दीड ते चार या काळात, ज्या दिवशी असेल त्या दिवशी सकाळी श्राद्ध तिथी नसताना सुद्धा सकाळ पासून दुपारी दोन - तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राद्धकर्म करता येते.
  • एकाच दिवशी म्हणजे एकाच तिथीला आई-वडीलांचे श्राद्ध करावयाचे असेल तर प्रथम वडीलांचे श्राद्ध करून नंतर आईचे श्राद्ध करावे.  अशा वेळेस दोन्ही श्राद्धांसाठी स्वतंत्र स्वयंपाक करावा.  ते शक्य नसेल तर किमान भात व खीर स्वतंत्र करावी आणि इतर स्वयंपाक एकत्र करून त्याचे दोन स्वतंत्र भाग काढून ठेवावेत व श्राद्धाच्या वेळी त्या त्या भागावर प्रोक्षण करावे.
  • अपघातामुळे घरातील ३-४ व्यक्ती एकाच वेळी मृत झाल्यास त्यांची श्राद्ध तिथी एकच असणार.  अशा वेळी एकाच कर्त्याने तीन-चार श्राद्धे एकाच दिवशी स्वत: करु नयेत.  श्राद्धाच्या अधिकाराप्रमाणे क्रमाने योग्य अशा व्यक्तीने उर्वरीत श्राद्ध/श्राद्धे करावीत.  जर श्राद्ध करण्यास अन्य कोणीही उपलब्ध नसेल तर पहिल्या दिवशी २ श्राद्धे करुन नंतर दुसऱ्या दिवशी उर्वरीत १-२ श्राद्धे करावीत.
  • महालय व श्राद्ध एकाच दिवशी असेल तर प्रथम श्राद्ध करावे व नंतर महालय करावा.
  • दर्शश्राद्ध आणि श्राद्ध एकाच दिवशी असेल तर प्रथम श्राद्ध करावे आणि नंतर दर्शश्राद्ध करावे.
  • पितृपक्षातील श्राद्ध त्या विशिष्ट तिथीस करावे.  त्या तिथीस करणे शक्य नसल्यास पितृ पक्षातील चतुर्दशीचा दिवस सोडून अन्य  कोणत्याही दिवशी करावे.
  • काही कारणाने पितृपक्षात श्राद्ध करणे जमले नाही तर पंचांगात दिलेल्या महालय समाप्तीपर्यंत कोणत्याही दिवशी पितृ पक्षातील करावयाचे राहिलेले श्राद्ध करावे.
  • एखाद्या व्यक्तीचे अंत्यकर्म ज्या गावात केले असेल त्याच गावात १०, ११, १२ व १३ व्या दिवसांचे कर्म करावे असे नसून कोणत्याही ठिकाणी त्या दिवसांचे श्राद्धकर्म करता येते.  तसेच, दरवर्षीचे श्राद्ध किंवा पितृपक्षातील श्राद्ध सुद्धा कोणत्याही ठिकाणी करता येते.

संपर्क करा




सर्वाधिक लोकप्रिय व्हिडिओ