Articles
पौरोहित्यासाठी संस्कृत आवश्यकच नव्हे तर अनिवार्य
( नोव्हेंबर २०१२ मधे मुंबई येथे संपन्न झालेल्या चतुर्थ संस्कृत संमेलनाच्या स्मरणिकेतील केळकर गुरुजी यांचा लेख )
‘संस्कार’ ही संस्कृत भाषेची सर्वात मोठी देणगी. बालपणापासून आपल्यावर जे धार्मिक संस्कार कळत-नकळत रुजवले जातात त्याचे स्वरूप किंवा तीव्रता कमी अधिक असली तरी अनिवार्यता खरंच आश्चर्यकारक असते. देवपूजा म्हणजे काय ? ह्याचे आपल्याला ज्ञान नसते. तरीही, केवळ गुरुजनांचा आग्रह म्हणून देवापुढे नतमस्तक होणे हे आपले नित्यनेमाचे कर्म होऊन जाते. घरातले धार्मिकतेचे वातावरण कमी-अधिक स्वरूपातले असले तरी सत्यनारायण, गणेशपूजन, वास्तुशांत ह्या आजच्या पिढीच्याही अंगवळणी पडलेल्या काही प्रथा. गुरुजींनी यजमानाच्या घरी जाऊन सर्व विधी यथासांग पार पाडावेत हा अलिखित नियम.
पुरोहित या शब्दाचा अर्थ पुरः – अग्रभागी, हित – स्थापित. ह्याला पुरोधा असेही म्हणतात. धार्मिक बाबतीत साहाय्य करणारा मुख्य ब्राह्मण म्हणजे 'पुरोहित'. बृहस्पती हा देवांचा पुरोहित होता असा उल्लेख वेदांमधे आढळतो. कसा असावा हा पुरोहित ? कौटिल्य म्हणतो की पुरोहित हा विख्यात, कुलशीलाचा, षडंगासहित वेद, नैमित्तिक कर्मे आणि शास्त्र ह्यात कुशल असावा. दैवी व मनुष्यकृत आपत्तींचा अथर्व वेदातील मंत्रांनी व व्यावहारिक युक्तींनी प्रतिकार करणारा असावा. २१ व्या शतकात जर आपण कौटिल्याचे मत खरे ठरवण्यास गेलो तर त्यात एक विधान अधोरेखित करावे लागेल की, पुरोहित हा संस्कृतभाषा उत्तमपणे जाणणारा असावा.
वेद, पुराण, ब्राह्मणग्रंथ यांच्या आधाराने मंत्रोच्चार करणारा पुरोहित हा ‘अर्थेषु मूढाः खरवत् वहन्ति’ असा नसावा. अर्थ व शास्त्राच्या बरोबरीने त्याला संस्कृत उच्चारांचेही उत्तम ज्ञान असावे. मंत्रांचा मनुष्यजीवनावर होणारा परिणाम अभूतपूर्व असला तरी तो सामान्य लोकांना माहीत नसतो. घरात धार्मिक कृत्य करत असताना, पुरोहिताकडून उच्चारल्या गेलेल्या मंत्रांचा प्रभाव पडावा असे जर वाटत असेल तर पुरोहिताचे संस्कृतचे उच्चार योग्य हवेत. तसेच मंत्रातील उदात्त व अनुदात्त स्वरांचे शास्त्रोक्त पठण व्हावयास हवे. जर यजमानाचे मुख्य उद्दिष्ट सफल होणे अपेक्षित असेल तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ही पुरोहिताचीच मानली जाते. बहुतेक यजमनांना संस्कृतचे ज्ञान अभावानेच असल्यामुळे वर्षानुवर्षे आपण चुकीच्या पद्धतीने धार्मिक कार्ये करत आहोत याची त्यांना जाणीवही नसते.
'संस्कृत' अनभिज्ञ पुरोहित व्यक्तींकडून रोजच्या रोज गंमतीशीर व अर्थहीन असे संस्कृतभाषेचे उच्चारण होत असते. त्यातले काही नमूने आपण पाहूया...
कोणत्याही धार्मिक कार्याची सुरुवात संकल्पाने होते. यजमानावर केवळ छाप पाडण्यासाठी, अनेक पुरोहित कित्येकदा साध्या सत्यनारायण पूजेचा संकल्प एक दोन पृष्ठे भरतील इतका मोठा सांगतात. यच्चयावत् सर्व कामनांचा उच्चार करून ‘प्राप्त्यर्थं’ हे सुपरिचित पद त्यापुढे जोडले जाते व यजमानही इतक्या सर्व गोष्टी मला प्राप्त होणार असा गोड गैरसमज करुन घेतो . वास्तविक, संकल्प हा नेमका असावा तरच त्याचे फळ मिळण्याची शक्यता जास्त असते. ‘गोत्रोत्पन्नः’ किंवा ‘गोत्रे उत्पन्नः’ असे यजमानाला म्हणायला सांगण्याऐवजी ‘गोत्र उत्पन्नः’ असे चुकीचे सांगितले जाते. ‘यजमानोSहं’ चा विग्रह ‘यजमानः अहम्’ सांगण्याऐवजी ‘यजमानो अहम्’ असा सांगितला जातो.
गोत्रोच्चार झाल्यावर ‘अमुक नाम यजमानः’ असे म्हणायला सांगण्याऐवजी कित्येक जण ‘अमुक नामा यजमानः’ असे यजमानाला म्हणायला सांगतात. यजमानाकडून पुरोहिताने ‘आचार्यवर्ण’ घेताना यजमानाच्या गोत्राची व नावाची प्रथमा विभक्ती तसेच पुरोहिताच्या गोत्राची व नावाची द्वितीया विभक्ती वापरावयास हवी. परंतु कित्येक वेळा दोन्हीकडे प्रथमा, दोन्हीकडे द्वितीया किंवा पुरोहिताच्या गोत्राची षष्ठी विभक्ती किंवा आयत्या वेळी सुचलेले पद पुरोहिताकडून उच्चारण्यात येते मग ते कोणत्याही विभक्तीचे का असेना !
तीन किंवा त्यापेक्षा जास्त मंत्र म्हणावयाचे असतात त्याच ठिकाणी ‘एभिर्मन्त्रै :’ असे म्हणावयाचे असते. ज्यावेळी एकच किंवा दोन मंत्र म्हटले जातात त्यावेळी ‘अनेन मंत्रेण’ किंवा ‘आभ्यां मंत्राभ्याम्’ असा योग्य तो बदल पुरोहिताकडून व्हावयास हवा. पण तो अनेक ठिकाणी झालेला दिसत नाही. हाच नियम पुरोहिताने ‘आचार्यवर्ण’ घेतल्यानंतर यजमानाला प्रतिवचन देतानाही लागू होतो. जर मुख्य पुरोहिताबरोबर तीन किंवा अधिक पुरोहित असतील तरच ‘एभिर्ब्राह्मणैःसह’ म्हणणे योग्य आहे. अन्यथा तृतीया एकवचन किंवा तृतीया द्विवचन पदाची योजना करावयास हवी.
‘गोप्रसवशांति’ मध्ये बिनदिक्कत ‘गवये नमः’ म्हणून गायीची पूजा केली जाते तर सप्तचिरंजीवांच्या आवाहन व पूजनाच्या वेळी मारुतीसाठी ‘हनुमतये नमः’ ची योजना केली जाते. ‘भव’ चा उच्चार ‘भवः’ होतो तर ‘सुरास्त्वामभिसिञ्चन्तु’ हे सूक्त यजमानावर जलाभिषेक करताना तसेच देवाच्या मूर्तीवरही अभिषेक करताना म्हणतात. देवतेची एक प्रतिमा गृहीत धरून प्रातिनिधिक स्वरूपात, पोथीतील अग्न्युत्तारण संकल्पात ‘अस्याः प्रतिमायाः’ व प्राणप्रतिष्ठापना संकल्पात ‘अस्यां प्रतिमायाम्’ दिले आहे. परंतु प्रतिमा जर दोन असतील तर दोन्ही ठिकाणच्या संकल्पामध्ये ‘अनयोः प्रतिमयोः’ व तीन किंवा अधिक प्रतिमा असतील तर दोन्ही संकल्पांमध्ये अनुक्रमे ‘आसां प्रतिमानाम्’ व ‘आसु प्रतिमासु’ असा बदल केला जाणे हे पुरोहिताकडून अपेक्षित आहे. स्थालीपाक प्रयोगात एके ठिकाणी ‘तस्यांबर्हिः प्रागग्रमुदगपवर्गमविरलमास्तीर्य’ असे लिहिले आहे. याचा अर्थ दर्भ पूर्वेकडे अग्र करून उत्तरेच्या दिशेने, अविरल आच्छादावेत असा होतो. परंतु संधीचा योग्य विग्रह लक्षात न आल्याने दर्भ विरळपणे पसरले जातात.
काही विशिष्ट गुरुपरंपरेमधे शिकलेले सर्व पुरोहित रोजच्या रोज अनेक देवतांना उद्देशून ‘आयुःकर्त्र्याः’, ‘क्षेत्रकर्त्र्याः’ ‘शान्तिकर्त्र्याः’ ‘निर्विघ्नकर्त्र्याः’ असे बिनधास्तपणे उच्चारत असतात व तेच योग्य आहे असे त्याचे प्रतिपादन असते. शेवटी, जर कोणतेही धार्मिक कार्य करताना त्यात देवतेशी संवाद असतो असे गृहीत धरले तर तो संवाद अर्थपूर्णच असायला हवा. संवाद अर्थपूर्ण होण्यासाठी मंत्रोच्चार योग्य पद्धतीने व्हायला हवेतच पण त्याबरोबरच केल्या जाणा-या कृतीमधील संस्कृत पदेही अचूकपणे वापरावयास हवीत. तरच त्याचा अपेक्षित अर्थबोध देवतेला होऊन योग्य व उत्तम फलप्राप्ती होते.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------