Annaprashan Sanskar performed by parents

षोडश संस्कार

                                                                 गर्भाधानो पुंसवनस्सीमन्तो वैष्णवोबलिः I  जातकं नाम निष्क्रामोऽन्नप्राशनं चोलकर्मच II  

                                 उपनीती महानाम्नी महाव्रतमनुत्तमम् I  उपनिषच्च गोदानं समावर्तनमेवच I  विवाहश्चेति संस्काराः षोडशैताः प्रकीर्तिताः II

हिंदू धर्मामध्ये मानवी देहावर जन्मापूर्वी आणि जन्मानंतरच्या  निरनिराळ्या अवस्थांमधे गर्भाधान, पुंसवन, सीमंतोन्नयन, विष्णुबली, जातकर्म, नामकरण, निष्क्रमण, अन्नप्राशन, चूडाकर्म, उपनयन, महानाम्नी, महाव्रत, उपनिषदव्रत, गोदान, समावर्तन आणि विवाह  हे सोळा संस्कार करावयास सांगितले आहेत.  संहिता, ब्राह्मणग्रंथ, श्रौतसूत्रे, गृह्यसूत्रे, धर्मसूत्रे, निबंधग्रंथ, प्रकरणग्रंथ आणि प्रयोगग्रंथ या सर्वांची या संस्कारांना मान्यता व सहमती आहे.  वैदिक परंपरेप्रमाणे हे संस्कार गर्भाधानापासून सुरू होतात आणि विवाह संस्कारापाशी येऊन संपतात. 

१)  गर्भाधान -  विवाहानंतर लगेचच हा संस्कार करतात. परंपरेनुसार पुढेही वंश निर्माण व्हावा यासाठी परमेश्वराकडे केलेली ही एक प्रार्थनाच होय.

२)  पुंसवन - सर्वसाधारणपणे गर्भधारणेनंतर दुसऱ्या महिन्यात हा संस्कार करतात. निरोगी, धर्मशील व सात्विक संतती जन्मास यावी हा या संस्कारामागील हेतू आहे.

३)  सीमंतोन्नयन -  सर्वसाधारणपणे गर्भधारणेनंतर तिस-या / चौथ्या महिन्यात हा संस्कार "अनवलोभन" या संस्कारासहित करतात.  आईच्या उदरातील गर्भाला स्थिरता प्राप्त व्हावी, गर्भपात न होता बलवान गर्भ निपजावा हा या संस्कारामागील हेतू आहे.

४)  विष्णुबली –  गर्भधारणेनंतर आठव्या महिन्यात हा संस्कार करतात.  सुलभ प्रसूती व्हावी तसेच जन्मणा-या बालकामधे कोणत्याही प्रकारचे शारीरिक व्यंग असू नये हा या संस्कारामागील हेतू आहे.

५)  जातकर्म - आईच्या उदरातून बाळ बाहेर आल्यानंतर नालच्छेदनापूर्वी हा संस्कार करत असत.  हल्ली रुग्णालयात प्रसूती होत असल्याने हा संस्कार करणे शक्य होत नाही.  गर्भातील पाण्याचे दोष नाहीसे व्हावेत हा या संस्कारामागील हेतू आहे.

६)  नामकरण – बाळाच्या जन्मानंतर १२ व्या किंवा १३ व्या दिवशी हा संस्कार करतात.  जगामधे बालकास एक विशिष्ट अधिष्ठान प्राप्त व्हावे हा या संस्कारामागील हेतू आहे.  या संस्काराबरोबरच "कर्णवेध" हा संस्कार देखील करतात.  अंतर्गळ (Hernia),

                       अंडवृद्धी (Hydrocele) या सारखे रोग टळावेत, मानसिक स्वास्थ्य वाढीस लागावे तसेच स्मरणशक्ती वाढीस लागावी हा या संस्कारामागील हेतू आहे.

७) निष्क्रमण –  जन्मानंतर दुस-या / तिस-या महिन्यात हा संस्कार करतात. या संस्काराबरोबरच "सूर्यावलोकन" हा संस्कार देखील करतात.   बालकाला प्रथमच घराबाहेर नेऊन विधिपूर्वक सूर्यदर्शन तसेच शक्यतोवर देवदर्शन करवतात.   पंचमहाभूतांप्रती

                       बालकाचा आदरभाव जागृत व्हावा हा या संस्कारामागील हेतू आहे.

८)  अन्नप्राशन –  जन्मानंतर सहाव्या महिन्यात हा संस्कार करतात.  बालकाला प्रथमच घन पदार्थ (Solid Food) भरवतात.  बालकाला निरनिराळ्या पदार्थांची रुची निर्माण व्हावी तसेच त्याची पचनशक्ती वाढावी हा या संस्कारामागील हेतू आहे.  

९)  चूडाकर्म – जन्मानंतर तिस-या वर्षी विधीपूर्वक केस कापून शेंडी ठेवण्याच्या या संस्कारास चूडाकर्म किंवा चौलकर्म असे म्हटले जाते.  आयुष्य, बल व तेज यांची वृद्धी व्हावी हा या संस्कारामागील हेतू आहे.   सध्याच्या काळात हा संस्कार वेगळा न करता उपनयन

                    (मुंज) या संस्काराबरोबर करतात.

१०) उपनयन –  जन्मानंतर आठव्या वर्षी हा संस्कार करतात.  (गुरुच्या) जवळ नेणे असा याचा अर्थ होतो.  या संस्कारानंतर बालकाचा दुसरा जन्म (Spiritual Birth) होतो असे समजतात. व या संस्कारानंतर ख-या अर्थाने अध्ययनाची सुरुवात होते व बालकाचा

                       ब्रह्मचर्याश्रमामधे प्रवेश होतो. (या संस्काराची स्वतंत्रपणे सविस्तर माहिती दिली आहे)

११) महानाम्नी  १२) महाव्रत  १३) उपनिषदव्रत – उपनयनानंतर पाच वर्षे अध्ययन केल्यावर प्रत्येकी एका वर्षाच्या अंतराने हे संस्कार  गुरुने करावयाचे असतात.

१४) गोदान – या संस्कारामधे अध्ययन समाप्तीनंतर साधारणपणे सोळाव्या वर्षी गुरूला विधीपूर्वक  गाय दान देतात.  ब्रह्मचर्याश्रमात झालेल्या व्रतभंगाचे प्रायश्चित हे देखील याच विधीचा एक भाग आहे.

१५) समावर्तन –  गुरूच्या संमतीने ब्रह्मचर्याश्रमातून निवृत्त होणे म्हणजेच समावर्तन संस्कार किंवा सोडमुंज.  किमान १२ वर्षे अध्ययन पूर्ण झाल्यानंतर म्हणजे साधारणपणे विसाव्या वर्षी हा संस्कार करतात.  या संस्कारा नंतर मुलगा विवाहयोग्य झाला आहे

                        असे समजतात. (या संस्काराची स्वतंत्रपणे सविस्तर माहिती दिली आहे)

१६) विवाह -  पुढील आयुष्याची जबाबदारी स्वतंत्रपणे स्वीकारणे, संसारासाठी आवश्यक असलेल्या वस्तू / पैसा मिळवणे, उत्तम व निरोगी प्रजा निर्माण करणे तसेच प्रसंगानुसार योग्य ते धार्मिक विधी पार पाडून देव आणि पितर यांच्या ऋणातून अंशत: मुक्त होणे

                   हा या संस्कारमागील हेतू आहे.  यामधे सुमारे दहा ते बारा निरनिराळ्या विधींचा समावेश असतो.  (या संस्काराची स्वतंत्रपणे सविस्तर माहिती दिली आहे)

 

या सोळा संस्कारांशिवाय दोहदपूर्ती (डोहाळेजेवण), अष्टमांगल्य (अठांगूळ - हा खरेतर  गर्भाधानानंतरचे संस्कार केले नसतील तर करावयाचा प्रायश्चितात्मक विधी आहे), षष्ठीपूजन, आंदोलनारोहण (पाळण्यात घालणे), दुग्धप्राशन (गायीचे दूध पाजण्यास प्रारंभ करणे), कटिसूत्रधारण व भुम्युपवेशन (कमरेत दोरा बांधून बालकाला भूमीवर बसवणे), प्रथम केशखंडन(जावळ), वर्धापन (वाढदिवस), अक्षरारंभ (अक्षरओळख) इत्यादि विधी स्थळकाळानुरूप व विशिष्ट कुलाचाराप्रमाणे केले जातात.

सध्याच्या काळात काही अपवादात्मक माहीतगार मंडळी वगळता बाकी सर्वजण उपनयन (मुंज), समावर्तन (सोडमुंज) व विवाह हे तीनच संस्कार विधिपूर्वक करतात.

GET IN TOUCH