Paarthiv Ganapati Puja, Ganesh Idol Puja, Ganesh Praan Pratishthaapana,

पूजा

अनादी, अनंत व निर्गुण निराकार असे ईश्वराचे वर्णन करणा-या प्राचीन वैदिक परंपरेतच मूर्तिपूजेचा समावेश असणे परस्परविरोधी वाटते परंतु ईश्वराचे खरे स्वरूप सर्वसामान्य माणसांच्या आकलनाच्या पलीकडील असल्यामुळे प्राचीन ऋषीमुनींनी जाणीवपूर्वकच  मूर्तिपूजेचा पुरस्कार केला असावा.

पूजेचे तीन प्रकार आहेत. परापूजा (ज्ञानी व्यक्तीने ईश्वराचे खरे स्वरूप जाणून केलेली पूजा), मानसपूजा (पूजासाहित्याविना मनात केलेली पूजा) व पार्थिवपूजा अथवा मूर्तिपूजा.   या तिन्हीमधे मूर्तिपूजा कनिष्ठ समजली जाते.

कोणत्याही पूजेमधे खालील विधी असतात.

द्विराचमन, पवित्रक धारण, प्राणायाम, देवतावंदन, देशकालसंकीर्तन, गणेशपूजन, आसनविधी, कलशपूजन, शंखपूजन, घंटापूजन, दीपपूजन, संकल्प, मुख्यदेवता पूजन, महाभिषेक, कथावाचन (वैकल्पिक), (आरती), मंत्रपुष्पांजली, प्रार्थना, प्रसादग्रहण, आशीर्वादमंत्र, गणपतीदेवता उत्थापन, द्विराचमन, ब्राह्मणपूजन, व उत्तरपूजा.

ज्याला आपण रूढ अर्थाने पूजा म्हणतो त्या मूर्तिपूजेचे पंचोपचार पूजा व षोडशोपचार पूजा असे दोन ढोबळ प्रकार आहेत.  सर्वसाधारणपणे रोज घरी केली जाणारी देवपूजा ही पंचोपचार पूजा असते तर विशेष प्रसंगी षोडशोपचार पूजा केली जाते.   

पंचोपचार पूजेमधे गंध (अक्षता व हळद/कुंकू), पुष्प, धूप, दीप आणि नैवेद्य यांचा समावेश होतो.

षोडशोपचार पूजेमधे (ध्यान), आवाहन, आसन, पाद्य, अर्घ्य, आचमन, स्नान (अभिषेक), वस्त्र, यज्ञोपवीत, गंध ( अक्षता व हळद / कुंकू ), पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, तांबूल, नमस्कार, प्रदक्षिणा  (मंत्रपुष्प व प्रार्थना) यांचा समावेश होतो.

सर्वसाधारण पूजा खालीलप्रमाणे :

१) अनंत पूजा - ही पूजा भाद्रपद शुक्ल १४  या दिवशी, विष्णूचा अवतार मानला गेलेल्या अनंताची करतात. हा दिवस अनंत चतुर्दशी या नावाने ओळखला जातो.

२) गणेश पूजा - गणेश हा गणपती किंवा विनायक या नावानेही ओळखला जातो. हिंदू रीतिरिवाजांप्रमाणे याची सर्वत्र पूजा होते. बहुतेकजण दरवर्षी भाद्रपद शुद्ध ४ किंवा माघ शुद्ध ४ या दिवशी नित्यनियमाने मातीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून तिची पूजा करतात.

गणपती ही बुद्धीची देवता असून सर्व कला व विज्ञानाचा तो आश्रयदाता आहे असे समजले जाते. त्याच्या हत्तीच्या तोंडावरून सहजच ओळख पटते. कोणत्याही विधी किंवा धार्मिक कार्यामधे याच्या पूजेपासूनच सुरुवात होते.

३) गणपती अथर्वशीर्ष सहस्रावर्तन - ही गणपतीचीच पूजा असते. फक्त अभिषेकाच्या वेळी विशेषरूपाने गणपती अथर्वशीर्ष सूक्त १००० वेळा म्हटले जाते.

४) घटस्थापना - ही देवीची पूजा असून चैत्र शुद्ध १ किंवा अश्विन शुद्ध १ या दिवशी ही पूजा करतात. या दिवसापासून पुढे ९ दिवस नवरात्र उत्सव चालतो.

५) गौरीपूजन - भाद्रपद शुद्ध ७ ला ही पूजा करतात.सर्वसाधारणपणे देवीचा मुखवटा असलेल्या मूर्तीची पूजा केली जाते.

६) हरितालिका पूजा - भाद्रपद शुद्ध ३ ला हे पूजाव्रत स्त्रियांकडून केले जाते. ही शिव-पार्वतीची पूजा असते.

७) लघुरुद्र - रुद्र हे शंकर म्हणजेच शिवाचे दुसरे नाव आहे. कोणत्याही शुभ दिवशी / कोणत्याही सोमवारी / शिवरात्रीला / महाशिवरात्रीच्या दिवशी ही पूजा करतात. यात विशेषरूपाने अभिषेकाच्या वेळी नमक व चमक असलेले रुद्रसूक्त १२१ वेळा म्हटले जाते.

८) लक्ष्मीपूजन - लक्ष्मी ही विष्णूची पत्नी असून ती धन किंवा संपत्तीची देवता आहे असे मानले जाते. अश्विन कृष्ण अमावास्येला ही पूजा करतात. हा दिवाळीचा तिसरा दिवस असतो.

९) ललितापंचमी पूजा - अश्विन शुद्ध ५ या दिवशी ही पूजा केली जाते व 'उपांगललिता व्रत' या नावानेही ओळखली जाते.

१०) मंगळागौर पूजा - विवाह झाल्यानंतर किमान पहिली ५ वर्षे हे पूजाव्रत स्त्रियांकडून केले जाते. ही गौरीची पूजा असून श्रावणातल्या प्रत्येक मंगळवारी ती केली जाते. ५ व्या वर्षी व्रत उद्यापन केले जाते.

११) ऋषिपंचमी पूजा - भाद्रपद शुद्ध ५ या दिवशी ही पूजा करतात. कश्यप, अत्रि, भरद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी, वसिष्ठ हे सात महाऋषि व अरुंधती (वसिष्ठ ऋषींची पत्नी) या सर्वांची या दिवशी पूजा केली जाते.

१२) सत्यदत्त पूजा - ही दत्ताची पूजा असून कोणत्याही शुभ दिवशी / कोणत्याही गुरुवारी करतात.

१३) सत्यविनायक पूजा - विनायक म्हणजेच गणपती. ही पूजा कोणत्याही शुभ दिवशी / कोणत्याही मंगळवारी अथवा कोणत्याही पौर्णिमेला करतात.

१४) सत्यांबा पूजा - अंबा म्हणजे देवी. ही पूजा कोणत्याही शुभ दिवशी / कोणत्याही मंगळवारी अथवा शुक्रवारी / चैत्र किंवा अश्विन नवरात्रीत करतात.

१५) सत्यनारायण पूजा - विष्णूचाच अवतार असलेल्या नारायणाची ही पूजा आहे व सर्वात मोठया प्रमाणावर केली जाते. कोणत्याही शुभ दिवशी ही पूजा करतात.

१६) तुळशीविवाह पूजा - कार्तिक शुद्ध ११ ते कार्तिक शुद्ध १५ (पौर्णिमा) या ४ दिवसांच्या कालावधीत कधीही ही पूजा केली जात असली तरी शक्यतोवर एकादशी अथवा द्वादशीच्या दिवशी प्राधान्याने होते.पूजा झाल्यानंतर तुळस (जी विष्णूला प्रिय आहे) या वनस्पतीचा विवाह विधी विष्णू अथवा कृष्ण (जो विष्णूचाच अवतार समाजाला जातो) याच्याशी संपन्न केला जातो.

१७) वटसावित्री पूजा - ज्येष्ठ शुद्ध १५ म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया ही पूजा करतात. आख्यायिकेनुसार, सावित्री नावाच्या पतिव्रतेने तिच्या पतीचे प्राण यमाकडून परत मिळवले होते. त्याप्रीत्यर्थ, वटवृक्षाला दोरा बांधून स्त्रिया पूजा करतात व पतीच्या सफलतेसाठी, समृद्धीसाठी व दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात.

संपर्क करा




सर्वाधिक लोकप्रिय व्हिडिओ