Lakshmi Pujan Ritual,

विवाह

विवाहातील  विधींची उपयुक्त  माहिती

कन्या वरयते रूपं माता वित्तं पिता श्रुतं | बान्धवाः कुलमिच्छन्ति मिष्टान्नमितरेजनाः  ||

( मुलगी मुलाच्या रूपाकडे पाहते, मुलीची आई त्याची सांपत्तिक स्थिती पाहते, मुलीचे वडील  त्याचे शिक्षण पाहतात, आप्त-बांधव कूळ पाहतात तर इतर सर्वजण लग्नात मिष्टान्न काय मिळेल याचा विचार करतात )
 

साखरपुडा 

वराने वधूला निवडली असून लवकरच त्यांचा विवाह होणार असल्याची ही नांदी असते. शास्त्रात नसलेला पण सज्जनांनी मान्यता दिलेला हा विधी असून तो बहुतेक वेळा विवाहाच्या आधी करतात.

देवक

मराठा समाजात, कार्यालयात देवक ठेवूनच नंतर सर्व विधी करण्याची पद्धत असते. ब्राह्मण समाजात जर काही कारणास्तव घरात देवक ठेवले नसेल तर ते कार्यालयात ठेवतात.

ग्रहमख

ब्राह्मण समाजात तसेच इतरही काही समाजात विवाहाच्या आधी, सर्वसाधारणपणे देवक ठेवण्याच्या दिवशी ग्रहमख (म्हणजेच ग्रहयज्ञ किंवा नवग्रह शांती) करतात.

पुण्याहवाचन, नवग्रहपूजा, कुळाची पूजा

मराठा समाजात कुळाची पूजा व काही जणांच्यात संक्षिप्त स्वरूपात नवग्रह पूजा सुद्धा पुण्याहवाचनाबरोबर करण्यात येते.

मुहूर्तमेढ

कित्येकदा ब्राह्मण समाजात घरी तर मराठा समाजात कार्यालयात मुहूर्तमेढ पूजा करतात.

घाणा भरणे
 

या विधीत तांदूळ, गहू वगैरे धान्य मुसळ व काठयांनी सडले जाते.

हळद / नीम सांडवणे
 

या विधीत वधू / वर तसेच कित्येकदा वधू-वरांचे आई, वडील व करवली यांना सुद्धा हळद लावली जाते.

वाङनिश्चय  

ब्राह्मण समाजात, विवाहाच्या आदल्या दिवशी संध्याकाळी किंवा विवाहाच्या दिवशी सकाळी सर्वप्रथम वर आणि वधूचे वडील गणपतीपूजन व वरुणपूजन करून ५ सुपाऱ्या व हळकुंड एकमेकांच्या उपरण्यात बांधून, विवाहनिश्चिती करतात.

व्याहीभेट

व्याही एकमेकांना भेटून आहेर देतात.

वधूची तेलसाडी

गौड सारस्वतांमधे या विधीपासून विवाहाच्या दिवशी सुरुवात होते.

सीमांतपूजन

खरे तर वधूच्या घरी येण्याआधी गावात शिरताना, गावाच्या सीमेवरच वराचे पूजन केले जात असे. सांप्रत काळात, कार्यालयातच वराला पोशाख, दागिना, मोत्याचा नारळ, मिठाई, वगैरे देण्याचा प्रघात आहे.
 

जानोसा

विशेषतः मराठा समाजात वराला पोशाख, दागिना, मोत्याचा नारळ, मिठाई, दूध वगैरे देऊन त्याचा आदरसत्कार केला जातो.

नातलगभेट

वराकडील ५ प्रमुख पुरुष मंडळी व वधूकडील ५ प्रमुख पुरुष मंडळी समोरासमोर भेटून आपली ओळख एकमेकांना सांगतात.  

विहीणभेट

दोन्ही विहिणी एकमेकांना भेटून आहेर देतात.

रुखवत-फराळ

वर, त्याचे आई-वडील, करवली, बहिणी, भाऊ, मित्र, यांना रुखवताच्या फराळाला बसवण्याचा प्रघात आहे. ब्राह्मण समाजात लाडू, करंजी, अनारसे, बटाटा भाजी, साखरभात, पापड, कुरडया, चटणी, खीर, इ. पदार्थ किंवा मिठाई / फळांच्या फोडी पानात वाढतात. कुडाळदेशकर समाजात वधूच्या घरी करून आणलेले ५ पदार्थ वाढतात.

मधुपर्क

हा विधी म्हणजे वराचा विशेष सन्मान होय.  वराचे दोन्ही पाय धुवून त्याला अर्घ्य, आचमन, व ३ वेळा मधुपर्क देतात. वराला गाय दान द्यावयाची असते.  पण बऱ्याचदा त्याऐवजी काही दक्षिणा देतात.  नंतर गंध, फुलांचा हार / गुच्छ, वस्त्र, जानवे वगैरे देऊन वराचा सन्मान करतात.  वराला भाऊ असतील तर त्यांचाही आहेर देऊन सन्मान करतात.

हाती लावणे

सीकेपी समाजात या विधीपासून विवाहविधी सुरु होतात.

गौरीहरपूजन

चौरंगावर थोडे तांदूळ घालून त्यावर अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवतात.  काही ठिकाणी बाळकृष्णाची मूर्तीही ठेवतात. काही ठिकाणी लाकडी बोळकी मांडतात तर काही ठिकाणी  मंडपी ठेवून त्यात गौर ठेवतात.  बाजूला समई ठेवतात. वधू मंगलाष्टकांच्या आधी  गौरीहरपूजन करते.  वराने लक्ष्मीपूजनासाठी ही अन्नपूर्णेची (व बाळकृष्णाची) मूर्ती न्यायची असा संकेत आहे. 

मंगलाष्टके

वराने बोहल्यावर उभे राहावे.  अंतरपाट धरून एखादे मंगलाष्टक झाल्यावर, वधूच्या  मामाने वधूला हाताला धरून वरासमोर आणून पाटावर उभी करावी.  अंतरपाट दूर झाल्यावर प्रथम वधूने वराला हार घालावा व नंतर वराने वधूला. एकमेकांनी एकमेकांना फुलांचा गुच्छ द्यावा.  दोन्ही बाजूकडील करवल्यांनी दोघांच्याही डोळ्यांना कलशातले पाणी लावून दिव्याने औक्षण करावे. 
 

विवाहमंत्र

ब्राह्मण समाजात, विवाह संपन्न करणाऱ्या गुरुजींनी (इतर आमंत्रित गुरुजींसमवेत) मंगलाष्टकांपूर्वी सत्येनोत्त सूक्त तसेच मंगलाष्टके संपल्यावर लगेचच आशीर्वादपर काही विशिष्ट मंत्र म्हणावयाचे असतात.

कन्यादान

वधूच्या ओंजळीवर वराने त्याची ओंजळ धरुन त्यावर वधूचे वडील त्यांचा उजवा हात निमुळता धरतात. त्यावर वधूची आई सतत पाणी टाकत राहते.  वधूचे वडील वराला त्यांच्या ऐपतीप्रमाणे वस्तू  देतात.  वधू-वर हे लक्ष्मीनारायणस्वरूप आहेत असे समजून फक्त लग्नाच्या दिवशी वधूच्या आई-वडीलांनी दोघांना नमस्कार करण्याची प्रथा आहे.  सुतात गुंफलेले हळकुंडरूपी कंकण वधू- वर एकमेकांना मनगटावर बांधतात.  वर वधूच्या गळयात मंगळसूत्र घालतो.   वधूची करवली दोघांच्याही उत्तरीयाची  गाठ मारते.

विवाहहोम

होमामधे तुपाच्या ५ आहुत्या दिल्यानंतर पाणिग्रहण व लाजाहोम असतो.  प्रथा म्हणून वधूचा भाऊ वराचा कान पिळतो. वराकडून त्याचा आहेर देऊन सन्मान केला जातो.  याला “कानपिळी” म्हणतात.  एकेका तांदूळराशीवरून स्वतःच्या पायाचा अंगठा पुढे सरकवत वधू ७ पावले चालते याला “सप्तपदी” म्हणतात.  ब्राह्मण समाजात वधूची बहीण/करवली  वधूच्या उजव्या पायाचा अंगठा दाबते व तिचा वधूकडून आहेर देववून सन्मान केला जातो. नंतर बाकी विधी झाल्यावर होंसमाप्ती केली जाते.

ऐरिणीपूजन (झाल)

वराचे वडील-आई, वर-वधू पाटावर बसतात.  त्यांच्या मागे / बाजूला वराकडील सर्व ज्येष्ठ मंडळी बसतात.  वधूचे आई-वडील उमा-महेश्वर यांचे पूजन करतात. वधूच्या उत्तम सांभाळाकरिता, वधूचे वडील वराच्या आई-वडीलांची प्रार्थना करतात. वधूची आई वराच्या आईची पांढरी साडी, विडा, नारळ, तांदूळ, गजरा, याने ओटी भरते. वधूची आई खणाची/ब्लाउजपीसची चुंबळ बसलेल्या सर्व मंडळींच्या डोक्यावर क्रमाने धरते व वधूचे वडील पेटवलेले १६ दिवे असलेले सूप त्यावर धरतात.  वधूची जबाबदारी आता वराकडील मंडळींवर आहे असा त्याचा गर्भितार्थ आहे.  याला ऐरिणीपूजन / झाल म्हणतात.
 

सुनमुख

वराची आई आपला मुलगा व सून या दोघांना आपल्या दोन्ही मांडयांवर बसवते, कंगव्याने तिचे केस विंचरते व आरसा धरून त्या दोघांचे एकत्र प्रतिबिंब आरशात पाहते.  नंतर दोघांच्याही तोंडात साखर किंवा पेढा भरवते. याला सुनमुख म्हणतात.
 

गोत्रचाटण

गौड सारस्वत ब्राह्मण समाजात गोत्रातील पुरुष मंडळींना उभे करून हा विधी करतात.  

लक्ष्मीपूजन

ताटात तांदूळ घेऊन, वर  सोन्याच्या तारेने किंवा अंगठीने वधूचे नाव लिहितो.  वधू उखाण्यातून ते नाव सर्वांना सांगते.  प्रथेप्रमाणे, वधूची ओटी भरून तिला साडी, ब्लाउजपीस, विडा, नारळ, गजरा, पेढा, एखादा दागिना, इ. दिले जाते.  लक्ष्मीपूजन हे खरं तर वराच्या घरी गेल्यानंतर करावयाचे असते.  सांप्रत काळी बहुतेकदा ते कार्यालयातच करतात.

देवकोत्थापन

ब्राह्मण समाजात जर कार्यालयात देवक ठेवले असेल तर  ते लक्ष्मीपूजनानंतर उठवतात.

कलाकुसरीची रुखवत मांडणी
 

टेबलावर शक्यतोवर पुढील वस्तू वधूपक्षाकडून मांडल्या जातात. 
वस्तू : २ बेडशीट, उशांचे अभ्रे, दाराचा पडदा, टेबल क्लॉथ, दरवाजाचे तोरण, इ. या वस्तू भरतकाम-विणकाम केलेल्या असतात.  शिवाय ५ प्रकारच्या खिरी, ५ प्रकारचे मुरांबे, ५ प्रकारच्या वड्या, विविध फराळाचे पदार्थ, छोटया पोत्यातून कोरडा शिधा, इ. असते.  सप्तपदी, हिरवा चुडा, आजचा मेनू, निरोप, इ. सर्व पुठ्ठयाचे, थर्माकोलचे विविध आकार कापून किंवा प्राणी, पक्षी बनवून त्यावर लिहीतात. काही ठिकाणी संसारोपयोगी भांड्याऐवजी डिनरसेट, डिशसेट, मिक्सर, फूड प्रोसेसर, वगैरे वस्तूही दिल्या जातात.  या सर्व वस्तू कार्यालयातून घरी जाताना वर घेऊन जातो.                      

संपर्क करा