Hindu Funeral RItes are performed on a dead body of a person in Crematorium

हिंदू अंत्यविधी संस्कार

अंत्येष्टी (अंत्य+इष्टी) म्हणजे कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्याच्या अखेरीस केली जाणारी 'इष्टी' म्हणजेच 'होम'.  हा अखेरचा होम होय.  व्यक्तीच्या निधनोत्तर शवास अग्नी दिल्यापासून ते त्या व्यक्तीचे प्रेतत्व निवारण होईपर्यंतच्या सर्व विधींचा अंतर्भाव अंत्येष्टीमधे होतो.

पूर्वक्रिया : प्रायश्चित्त व दहन म्हणजेच और्ध्वदेहिक

मध्यमक्रिया : प्रेतश्राद्धे व दानविधी

उत्तरक्रिया : सपिंडीकरणानंतरची पितृश्राद्धे

व्यक्तीने गृहस्थाश्रमात प्रवेश करताना (म्हणजेच विवाहहोमात) सिद्ध केलेल्या गृह्याग्नीवर जीवनातील विविध संस्कार संपन्न होत असतात.  अंत्येष्टीमधील दाहसंस्कार सुद्धा त्याच अग्नीवर करतात.  सध्याच्या काळात गृह्याग्नी जतन करून ठेवला जात नाही म्हणून अंत्येष्टीच्या प्रारंभी गृह्याग्नीलोपाचे प्रायश्चित्त केले जाते.  त्यानंतर 'क्रव्याद' नावाचा अग्नी सिद्ध करुन दहन म्हणजेच और्ध्वदेहिक करण्यात येते.  म्हणूनच याला 'मंत्राग्नी' असे संबोधतात.  त्यानंतर अस्थिसंचयन करतात.

इथे लक्षात घेतले पाहिजे की, और्ध्वदेहिक हे व्यक्तीच्या मृतदेहाशी म्हणजेच शवाशी संबंधित असते तर त्यानंतर केली जाणारी सर्व  श्राद्धे प्रेतात्म्याशी  संबंधित असतात.

और्ध्वदेहिकानंतर परलोकी प्रविष्ट झालेल्या प्रेतात्म्यास पहिल्या दिवसापासून सलग ९ दिवस पिंडदानाच्या आधारे निरनिराळे अवयव प्राप्त करुन दिले जातात.  त्यांना 'अवयवश्राद्ध' असे म्हणतात.  प्रथम दिवसाच्या अवयवश्राद्धामुळे मस्तकाची निर्मिती होते व नंतर पुढील ९ दिवस क्रमाक्रमाने सर्व अवयवांची निर्मिती होऊन दहाव्या दिवशी पूर्णत्वास पोहोचलेल्या लिंगदेहाची तहानभूक पिंडदानामुळे शमते.  

अवयवश्राद्धानंतर 'नवश्राद्ध' केले जाते.  यातील 'नव' हे पद संख्यावाचक नसून त्याचा अर्थ 'नवीन' असा आहे.  ही नवश्राद्धे केवळ विषम दिनी म्हणजेच पहिल्या, तिसऱ्या, पाचव्या, सातव्या, नवव्या व अकराव्या दिवशी करतात म्हणून त्यांना 'विषमश्राद्ध' असेही म्हणतात.  ही सर्व श्राद्धे प्रेतत्व निवारणासाठी असतात.  यानंतर प्रेतास आच्छादन करण्याच्या उद्देशाने 'नग्नप्रच्छादनश्राद्ध' केले जाते.  यानंतर 'पाथेयश्राद्ध' करुन प्रेतास त्याच्या परलोक प्रवासामधे उपयोगी अशी शिदोरी देण्यात येते.  यानंतर 'अस्थिसंचयनश्राद्ध' व 'वेदिकाश्राद्ध' केले जाते.  दहाव्या दिवशी शेवटचे 'अवयवश्राद्ध' व 'काकबली' हा महत्वाचा विधी करतात.

अकराव्या दिवशी 'मरणशांती' (जर गतव्यक्तीचा मृत्यू काही विशिष्ट नक्षत्रावर झाला असेल तरच यापैकी शांती करावी लागते. उदा : द्विपाद नक्षत्रशांती, त्रिपाद नक्षत्रशांती अथवा पंचक नक्षत्रशांती) करतात.  त्याचबरोबर 'वृषोत्सर्ग' (सध्याच्या काळात लुप्त झालेला), महैकोद्दिष्टश्राद्ध (अखेरचे एकोद्दिष्ट), 'रुद्रगणश्राद्ध' व 'वसुगणश्राद्ध' करतात.

तेराव्या दिवशी 'निधनशांती' व प्रेतात्म्याची तृषाशांती व्हावी म्हणून 'उदकुंभश्राद्ध' करतात.  त्यानंतर किमान १६ श्राद्धे (अधिक महिना किंवा क्षय महिना आल्यास या संख्येत फरक पडतो) मृत्युनंतर एक वर्ष पूर्ण होईपर्यंत करावयाची असतात.  'सपिंडीकरणश्राद्ध' हे मृत्युनंतर एका वर्षाने करावयाचे असते.  कारण त्यावेळी ख-या  अर्थाने गतव्यक्तीची प्रेतत्व निवृत्ती होऊन त्याला पितृलोक प्राप्त होतो.  सद्यकाली वर्षपूर्तीच्या दिवशी विहित असलेला सपिंडीकरण विधी अपकर्षाने बाराव्या दिवशीच करतात.  त्यामुळे प्रथम वर्षी येणारी १६ मासिक श्राद्धे अकराव्या दिवशीच सहतंत्राने व एकोद्दिष्ट विधीने करतात.

और्ध्वदेहिकानंतर केल्या जाणा-या सर्व श्राद्धांमुळे प्रेतात्म्यास लिंगदेहाची प्राप्ती होऊन त्यास निर्धारित स्थान मिळते.  त्यानंतर केल्या जाणा-या निरनिराळ्या दानविधींमुळे मृतात्म्यास उत्तम लोकाची प्राप्ती होते.

सपिंडीकरणानंतरच्या सर्व पितृश्राद्धांमुळे प्रेतात्म्याची तृप्ती होऊन त्यास सद्गती प्राप्त होते. 

संपर्क करा




सर्वाधिक लोकप्रिय व्हिडिओ